मुक्त संचार गोठा:-
पारंपरिक पद्धत आणि तिचे दोष
भारतीय दूध उत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करीत आला आहे. पारंपरिक पद्धती मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याकडील दुभत्या गायींची संख्या कायम मर्यादित राहिली.
उदाहरणार्थ,
एका शेतकऱ्या कडे आज एक गाय आहे आणि ती दरवर्षी किंवा २ वर्षाआड वेत्ये, तर ४-५ वर्षांनी गाय व तिची पुढची पिढी मिळून ४-५ जनावरे त्याच शेतकऱ्या कडे असली पाहिजेत. ते ना होता, त्या शेतकऱ्या कडे ३-४ वर्षांनी सुद्धा १ किंवा २ च गाई दिसतात.
त्याच बरोबर प्रति गाय व म्हैस या दुभत्या जनावरांची दूध उत्पादन करण्याची सरासरी ही फारच कमी आहे.
९० टक्क्यांपेक्षाही जास्त दूध उत्पादका कडे २ ते ३ याच प्रमाणात गाई आहेत. गाईंची संख्या व वंशावळी ची गुणवत्ता वाढल्याशिवाय दूध उत्पादक शेतकरी फायद्यात येणे शक्य नाही.
दुग्धव्यवसायातील अपयशाची कारणे
दुभत्या गाई व म्हशींची प्रति दूध उत्पादक शेतकरी संख्या मर्यादित राहण्याची प्रमुख दोन कारणे पुढील प्रमाणे आहेत.
पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करताना दिवसभर अति कष्ट करावे लागणे.
दूध उत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीमध्ये दिवसातून २ ते ३ वेळा शेण उचलतो.
संपूर्ण वर्षभर लागणाऱ्या पौष्टिक चाऱ्याचे नियोजन नसणे.
दूध धंद्यामध्ये हमखास बक्कळ उत्पन्नासाठी काय कराल
दिवसभरातील अति कष्ट वाचावेत यासाठी मुक्तसंचार गोठा व वर्षभराच्या पौष्टिक चाऱ्याचे नियोजन व्हावे म्हणून मुरघास निर्मिती केली पाहिजे.
दुभत्या गाईचे संगोपन करताना त्यांच्या साठी मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये शेतकऱ्यांचे कष्टही कमी होतात व गाईचे स्वास्थ्य देखील चांगले राहते. परिणामतः दूध उत्पादनात वाढ होते.
मुक्तसंचार गोठा पद्धत म्हणजे काय
मुक्तसंचार गोठ्या मध्ये गाईंना बांधले जात नाही.
गाईंना एका मोठ्या कंपाऊंड मध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते.
त्यांच्या चाऱ्याची व पाणी पिण्याची व्यवस्था तिथेच गव्हाणा मध्ये करण्यात येते.
शेण वारंवार काढले जात नाही.
गाई एकेमकाना मारत नाहीत.
एका गाईला किंवा म्हैशीला मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यात मोकळे सोडण्या साठी कमीत कमी २०० चौ. मी. जागा लागते. एक गुंठा जमीन क्षेत्रात आपण पाच मोठी जनावरे मोकळी सोडू शकतो. गाईला मुक्त सोडण्या पूर्वी तार जाळीचे किंवा भिंतीचे अर्ध्या जाळीयुक्त कंपाउंड करून आत मध्ये गव्हाण व पाण्याच्या हौदाची व्यवस्था करणे आवश्यक असते. गाईला मोकळे सोडल्यावर एक ते दोन दिवस मुक्त पद्धतीची सवय लागण्यात जातात.
या कालावधीत शेतकऱ्याने सतर्कता बाळगायला हवी. गाई मोकळ्या सोडल्यावर त्या एकमेकींना मारतील या भीतीने शेतकरी मुक्त गोठा पद्धत अवलंब करण्यापासून माघार घेतात. परंतु पहिले दोन दिवस सवय लागल्यावर गाई एकमेकांना मारत नाहीत. जर एखादी गाय इतर गाईंना मारत असेल तर तिला पायकूट घालून आपण प्रतिबंध करू शकतो. गाईच्या तोंडाच्या म्होरकीला एक बाज व कोणत्याही एका पायाच्या गुडघ्याच्या थोडेसे वर असे दोरीच्या साहाय्याने आखडून बांधणे म्हणजेच पायकूट घालणे होय. अशा प्रकारे आपण जनावरांच्या हालचालीवर प्रतिबंध घालू शकतो.
मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्याचे फायदे
कमी खर्च
या पद्धतीचा गोठा हा कमीत कमी खर्चात सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी करू शकतो.
निर्जंतुक गोठा
तार-जाळी व लोखंडी अँगल च्या साहाय्याने कंपाउंड करून कोणत्याही एका बाजूला गव्हाण केली जाऊ शकते. शक्यतो वैरण खाताना गाईंचे तोंड सूर्याच्या उगवत्या किंवा मावळत्या दिशेला असावे, जेणेकरून गोठा कोरडा व निर्जंतुक राहण्यास मदत होते. यामुळे गाई कायम स्वच्छ राहतात व दगडी (मस्ताइटिस ) सारख्या आजारांचे प्रमाण कमी होते.
सावली आणि रोगप्रतिकारक शक्ती
संकरित गाईंचा सांभाळ करताना त्यांना वर्षभर चांगली सावली व बसण्यासाठी कोरडी जागा लागते. मुक्तसंचार गोठ्या मध्ये झाडांची, किंवा शेडची सावली गाईंना लाभदायक ठरते. उन्हाळ्याच्या किंवा उन्हाच्या वेळी धापा टाकण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे गाईंवरील तणाव कमी होऊन रोगप्रतिकारकशक्ती टिकण्यास मदत होते. परिणामतः दूध उत्पादन वाढते.
पिण्याचे पाणी आणि दूध देण्याची मात्रा
पाणी पिण्याच्या हौदामध्ये किंवा कुंडीत गाईंना तहान लागल्यावर पाणी पिण्यास मिळते. हिरवा चारा, वाळला चारा व पिण्याचे पाणी या सर्व माध्यमातून जेव्हा गाईच्या शरीरात ४-५ लिटर पाणी जाते, तेव्हा गाईच्या कासेमध्ये कमीतकमी एक लिटर दूध तयार होते. यामुळे तहान लागल्यावर पाणी पिण्यास मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी मुक्त गोठा हा एकमेव पर्याय आहे.
खरारा
मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्या मध्ये गाईंना खरारा करणे सोपे जाते. यासाठी एखादा खांब मधोमध रोवून, त्यावर नारळाचा काथ्या ओला करून गुंडाळावा. गाई त्यावर आपले शरीर घासण्याचा प्रयत्न करतात. यामुळे गाई तणावमुक्त होऊन त्यांची त्वचा व्यवस्थित राहते.
शेण आणि मेंटेनन्स
दूध उत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीमध्ये दिवसातून २ ते ३ वेळा शेण उचलतो. परंतु मुक्त गोठा पद्धतीमध्ये शेण महिन्यातून एकदा काढले तरी चालते. सूर्यप्रकाशामुळे शेण वाळते जाऊन शेणखताची भुकटी तयार होते. त्यामध्ये गाईची लघवी मिसळली गेल्याने उत्तम प्रकारचे शेणखत तयार होते. त्याचबरोबर होमनी नावाच्या किड्याची निर्मिती सुद्धा या भुकटी झालेल्या खतामध्ये होत नाही. हे शेणखत शेती चे उत्पादन वाढविण्यास उपयोगी पडते. मुक्त गोठा पद्धतीमध्ये फक्त पावसाळ्या मध्ये पाऊस चालू असे पर्यंत दररोज शेण उचलावे लागते.
मजुरी खर्च
मुक्त गोठा पद्धतीमध्ये शेतकऱ्याला जनावरांची जागा बदलणे, शेण उचलणे, पाणी पाजणे ही तिन्ही कामे करण्याची आवश्यकता राहत नाही. कष्ट वाचते, वेळ वाचतो. याचा परिणाम म्हणजे मजुरांवरील खर्च वाचतो. मजुरांचे प्रमाण कमी लागते, म्हणून कमीत कमी मजुरांमध्ये जास्तीत जास्त गाईंचा सांभाळ शक्य होतो.
गाईंचे संरक्षण
गाईभोवती कंपाउंड असल्याने रानटी प्राणी किंवा पिसाळलेले कुत्रे यापासून गाईंचे संरक्षण फक्त मुक्त संचार गोठ्या मधेच शक्य आहे. प्रत्येक वयोगटाच्या जनावरांची व्यवस्था स्वतंत्रपणे करता येते. व्यायलेल्या गाई, गाभण गाई व वासरे यांचे कप्पे स्वतंत्र केल्याने चारा व खुराक (पशुखाद्य) उत्पादनाप्रमाणे देणे सोयीचे जाते. त्यामुळे अनावश्यक खर्च वाचून बचत होते. नफ्यात वाढ होते.
निरोगी गाई
मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यामुळे गाईंमधील आजारांचे प्रमाण देखील कमी होते.
Comments
Post a Comment