केळ्याचे वेफर्स बनवून केली या तरुणाने गरीबीवर मात:-
ग्रामीण भागातील अनेक तरुण रोजगारासाठी शहरे गाठतात. त्यामुळे गावे ओस पडत असून शहरांमध्ये बेरोजगार तरुणांचे लोंढे वाढत चालले आहेत. आजही तरुण स्वत:च्या व्यवसायापेक्षा नोकरीलाच प्राधान्य देत आहेत. आपल्या गावातच रोजगाराची निर्मिती होऊ शकते याची कल्पनादेखील त्यांना नसते. कल्पकतेला प्रयत्नाची जोड मिळाली तर निश्चितच बेरोजगारीवर मात करता येते, याची प्रचीती चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील दिनेश पाटील या होतकरू तरुणाने चालू केलेल्या केळी वेफर्सच्या व्यवसायातून दिसून येते.
वाघळी गावाजवळ रस्त्याच्या कडेला कच्च्या केळीचे वेफर्स तळून विक्री करणारा दिनेश पाटील परिसरातील तरुणांसाठी आदर्श आहे. परिस्थितीमुळे दिनेशचे शिक्षण बारावीपर्यंतच होऊ शकले. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागावा म्हणून काही काळ खासगी ठिकाणी नोकरी केली. नोकरीत मनासारखा पगार मिळत नसल्यामुळे अनेकदा आर्थिक ओढाताण होत असे.
त्यामुळे खासगी नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, असा विचार मनात येत होता. अशातच यावल तालुक्यातील मनुमाता मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेले असता यावल रस्त्यावरील आडगाव गावाजवळ कच्च्या केळीपासून वेफर्स तयार करताना काही जण दिनेशला दिसून आले. उत्सुकता म्हणून त्याने विचारपूस सुरू केली. त्यातील बारकाव्यांची माहिती मिळविली आणि आपल्या गावातच हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
दिनेशने या धंद्यातील काही जाणकार व्यक्तींना भेटून अधिक माहिती जाणून घेतली. व्यावसायिक दृष्टी ठेवत योग्य नियोजन करत वाघळी गावातच कच्च्या केळीपासून वेफर्स तयार करून ती विकण्याचा व्यवसाय सुरू केला. ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे दिनेशने आपले सर्व लक्ष या व्यवसायाकडे केंद्रित केले. त्याचा व्यवसाय आता प्रगतीकडे झेप घेत आहे. या व्यवसायासाठी लागणारी कच्ची केळी वाघळी व वाघळीलगतच्या गावांमधून खरेदी करतो. त्यामुळे स्थानिक शेतकर्यांनादेखील त्यांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळत आहे.
त्यामुळे शेतकरीदेखील आनंदाने त्याकडे कच्ची केळी विक्रीसाठी आणतात. एक किलो केळीचे साधारणपणे २०० ग्राम वेफर्स तयार होतात. १२० किलो दराने वेफर्स विकली जातात. कच्ची विकत घेण्यापासून ते वेफर्स तयार करून विकण्यापर्यंत येणारा खर्च वजा जाता मिळणारा नफा समाधानकारक असल्याचे दिनेश आनंदाने सांगतो.
गुणवत्तापूर्ण वेफर्स ग्राहकांच्या पसंतीला उतरल्यामुळे रोज १५ ते २० किलो वेफर्सची विक्री होते. विक्री वाढल्यामुळे या व्यवसायात मदतीसाठी गावातील आणखी तीन तरुणांना त्याने रोजंदारीवर ठेवले आहे. या व्यवसायामुळे दिनेश पाटील आपल्या कुटुंबाचा चरितार्थ उत्तमरीत्या चालवत आहे. आपल्या या व्यवसायामुळे आणखी तीन लोकांना रोजगार मिळाल्याचे तो अभिमानाने सांगतो.
Comments
Post a Comment