Pohe विकून महिन्याची कमाई 1.15 लाख रुपये!:-
Pohe हा न्याहरीमधील पदार्थ म्हणजे आपला जीव की प्राण! गरमागरम कांदे पोहे, त्यावर कोथिंबीर, थोडीशी शेव आणि त्यानंतर रसरशीत पिळलेला लिंबू… अहाहा!!! खरतर सकाळचा नाश्ता पोह्याविना अपूर्णच ठरतो. म्हणून अशा पोह्यांशिवाय आपल्या मराठी लोकांची सकाळ अपूर्णच ठरावी. परंतु, आता विभक्त कुटुंबपद्धतीत दोघं नोकरीला. तेही भल्या सकाळी घरातून निघणार… अशावेळी पोहे किंवा सकाळचा ब्रेकफास्ट कोण बनविणार. म्हणून मुंबई आणि उपनगरात रोडसाईड ब्रेकफास्ट जॉईन्ट्स तयार झाली आहेत. हे ब्रेकफास्ट जॉईन्ट्स दिवसाला लाखोंहून अधिक रुपयांचा गल्ला जमवितात. पाहुया आज अशाच एका ब्रेकफास्ट जॉईन्ट्सचे डेली इकोनॉमिक्स…
पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन स्टेशनहून बाहेर पडलात की बाजूलाच एक छोटसं टेबल आणि त्याला घोळका करुन उभी असलेली 10-20 लोकं काहीतरी खाताना दिसतील. जरा जवळ गेले की, पोहे आणि उपमा या पदार्थांचा सुवासही येईल. यांच्यासारखे अनेक खवय्ये सकाळी-सकाळी चविष्ट ब्रेकफास्टवर ताव मारण्यासाठी येथे येतात, रोज ते सुद्धा न चुकता… साधारण 10 वर्षांपासून पूजा खेडेकर यांनी त्यांचा हा छोटासा बिझनेस सुरू केला. पूजा या एल्फिन्स्टन स्टेशननजीकच राहतात. हा परिसर म्हणजे मोठ-मोठ्या कंपन्यांचे हबच जणू. भल्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत येथे कर्मचा-यांची ये-जा सुरू असते. अशा कर्मचा-यांना ब्रेकफास्ट पुरविण्याचा बिझनेस पूजा खेडेकर आणि त्यांचे कुटुंबिय करतात.
नुसते कांदेपोहे नाहीतर जोडीला उपमा, शिरा, आणि उपवासासाठी साबूदाणा खिचडी असा त्यांच्या ब्रेकफास्ट जॉईन्टचा मेन्यू आहे. दिवसाची तयारी त्या पहाटे 4 वाजता उठून करतात. सर्वप्रथम या पदार्थांना लागणारा कांदा त्या चिरतात. नंतर शिरा, उपमा, पोहे आणि शेवटी खिचडी करुन बरोब्बर सकाळीच्या सुमारास त्यांचा जाईन्ट एल्फिन्स्टन स्टेशन बाहेर खवय्यांची भूक भागविण्यासाठी लागलेला असतो. बरं शिरा, उपमा, पोह्यांसाठी 12 तर खिचडीच्या प्रत्येक प्लेटसाठी 22 रुपये आकारतात.
आता पाहुया या जॉईन्टचे डेली इकोनॉमिक्स… साधारण सकाळी 7 ते 11 पर्यंत 400 ते 500 जण येथे ब्रेकफास्ट करतात किंवा पार्सल घेऊन जातात. जर एका प्लेटची सरासरी किंमत 15 रुपये धरली तर महिन्याचा रेव्हेन्यू 1,95,000 एवढ्यावर जातो. शिरा, उपमा, पोहे आणि खिचडी बनवण्याच्या सामग्रीसाठी दिवसाला 3,055 रुपये, असे महिन्याचे 80 हजार रुपये इतका खर्च येतो. सरते शेवटी 1,15,000 रुपये महिन्याची कमाई होते, असा आहे पूजा यांचा रोजचा उदरनिर्वाह…
पूजा सांगतात, ब्रेकफास्ट जाईन्ट हा आमचा फॅमिली बिझनेस आहे. कोणी बाहेरील व्यक्ती आम्हाला मदत करत नाहीत. काहीजणांना महिनाभर काम करुन मिळत नाही तेवढे पैसे पूजा आणि त्यांचे कुटुंब कमावतात. मित्रांनो, काम कोणतेही असो त्यावर आपला उदरनिर्वाह होत असतो. तसेच बिझनेस छोटा असो वा मोठा तोही आपले घरच चालविण्याचे काम करतो. पूजा खेडेकर यांच्या ब्रेकफास्ट जॉईन्टची कहानी आपल्यासारख्या अनेकांनासाठी प्रेरणादायी आहे.
Comments
Post a Comment