कृषी विद्यापीठाची मदत घेत, अभ्यास करून घेतले गुछाडीचे पीक
सातारा जिल्ह्यातील सासुर्वे गावातील चांगदेव विष्णू मोरे यांनी ग्लॅडिओलस व गुलछडी या फुलांची शेती आधुनिक पद्धती वापरून तसेच नवीन प्रयोग करून यशस्वी शेती केली आहे.मोरे हे एक उच्चशिक्षित प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी 'बीएस्सी अॅग्री'ची पदवी संपादन केली आहे.
चांगदेव यांचे वडील विष्णू मोरे हे सैन्यातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेले प्रगतशील शेतकरी होते. चांगदेव यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते नोकरी करू लागले. कृषी सेवा केंद्रही सुरू केले. नोकरीत मन लागत नव्हते. शेतीत ओढा कायम असल्याने नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीच करण्यास सुरवात केली. शेतीत काही नवे करण्याची आस होती, ते करण्यासाठी प्रथम महाबळेश्वर येथून १९९० मध्ये स्ट्राॅबेरीची रोपे आणून थोड्या क्षेत्रात लागवड केली. पठारावर या पिकाच्या लागवडीचा प्रयोग यशस्वीपणे पार केला. चांगले उत्पादन मिळाल्यावर आणखी रोपे तयार करून एक ते दोन एकर क्षेत्रावर वाढविली. त्या वेळी चांगदेव यांना एकरी चार लाख रुपयांपर्यंत उत्पादन मिळाले होते.
ग्लॅडीओलसचे पीक लावून केलं संधीचं सोनं
स्ट्राॅबेरीनंतर नवे पीक लावण्यासाठी चांगदेव अभ्यास करत होते. अशातच पणन विभागाकडून ग्लॅडीओलस फुलाविषयी व त्याच्या हॉलंडवरून आणलेल्या कंदांविषयी माहिती झाली. चांगदेव यांनी हे कंद घेतले. या पिकाबाबत फारशी माहिती नसतानाही कृषी विद्यापीठातून मार्गदर्शन घेऊन त्यांनी ग्लॅडिओलसच्या कंदाची लागवड केली.
नव्या पिकाचे व्यवस्थापन
कंद लागवड क्षेत्र - ५ गुंठे
तिसऱ्या वर्षी - २० गुंठे
सध्या वर्षातून दोन वेळा हे पीक घेतले जाते.
खत - शेणखत
तीन फुटांचा गादीवाफा तयार करून दोन ओळींत अर्धा फूट अंतर ठेऊन कंदाची लागवड केली जाते.
साधारण ७५ ते ८० दिवसांनी उत्पादन सुरू होते.
पाहिल्यावर्षी उत्पन्न - ३० हजार
साधारणपणे एक महिना उत्पादन मिळते. सकाळी लवकर कांड्या काढून मुंबई मार्केटसाठी ५० तर पुणे मार्केटसाठी १० कांड्याची मोळी बांधली जाते.प्रति वर्षी साधारणपणे दीड लाख कंदांची विक्री जाते. उन्हाळ्यात तसेच गणपती उत्सवाच्या हंगामात फुलांना मागणी जास्त असते.
खर्च व उत्पन्न -
साधारण ३० गुंठे क्षेत्रात भांडवली खर्च ३० हजार रुपये (कंद वगळता) येतो.
उत्पादन - ५० हजार काडी
प्रति काडी दर - पाच ते सात रुपये
उपन्न - जवळपास अडीच लाख रुपये
फुलांच्या विक्रीबरोबर महाराष्ट्रासह कर्नाटक, म्हैसूर आदी ठिकाणीही कंदाची विक्री केली जाते. गावातील तरुणांनी संघटित करून शेतकरी बचत गटाची स्थापना केली आहे. त्यांना फूलशेतीकडे वळवत प्रयोगशील शेतीत उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.
निशिगंधाची जोड
ग्लॅडीओलस फुलाला गुलछडीची (निशिगंध) जोड दिली आहे. गणेशखिंड येथून त्याचे ३०० कंद मिळाले होते. सन २०११-१२ मध्ये एक गुंठ्यात लागवड केली. फुलांच्या उत्पादनाबरोबर कंदांचे उत्पादन वाढविले. साधारणपणे दहा गुंठे क्षेत्रावर त्याची सद्यस्थितीत लागवड केली जाते. प्रतिकाडी दोन ते अडीच रुपये दर मिळतो. वार्षिक एक लाख ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळते. कंदापासून वेगळे उत्पन्न मिळते. फुलांची विक्री सातारा येथे होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले रजनी सिंगल व सुहासिनी डबल या वाणांची लागवड होते.
तरुणांना प्रयोगशील शेतीकडे वळवण्यासाठी केले प्रोत्साहन
तरुणांना शेतीतील नवीन माहिती मिळावी यासाठी चांगदेव यांनी पुढाकार घेत कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आदी ठिकाणी शेतकरी सहली आयोजित केल्या. सपत्नीक इस्त्राइल, इजिप्त दौराही केला आहे. गावचे उपसरपंच असताना गावच्या पाणलोट विकास योजनेतून १३ शेततळी खोदली आहेत. त्यांच्यासह ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून २५ एकर क्षेत्रावर वनीकरण झाले आहे. चांगदेव यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सेवागिरी व अजिंक्यतारा फळ, फुले संस्थेचा शेतीनिष्ठ पुरस्कार, भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे नवोन्मेषी कृषी सन्मान (२०१६) पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment