बेळंकी गावाची सुपर वुमन
बेळंकी (ता. मिरज,जि.सांगली) येथील सौ.राजश्री सिद्धार्थ दरबारे गेल्या १८ वर्षांपासून शेती करत आहेत . घर, आपली मुले सांभाळून त्या शेती करतात. काही वर्षांआधी त्यांच्या वाट्याला वडिलोपार्जित चार एकर शेती आली. परंतु राजश्री यांचे पती वैद्यकीय अधिकारी सिद्धार्थ दरबारे नोकरी करत असल्यामुळे त्यांना शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष देणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांच्या पत्नी सौ. राजश्री सिद्धार्थ दरबारे यांनी शेतीची जबाबदारी सांभाळण्याचे ठरवले.
सुरुवातील राजश्री यांना शेतीची सखोल माहिती नव्हती. हळूहळू प्रत्यत्न करत त्यांनी शेती करण्याची कला अवगत केली. मी कृषी प्रदर्शन, कार्यशाळांना भेट देते, त्यातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग मी शेती करताना करते असे, सौ. राजश्री यांनी इंडिअन रुट्झ ऍग्रोशी बोलताना सांगितले. सुरुवातीला दरबार यांच्याकडे एकूण चार एकर शेती होती. या चार एकरवर मका, केळी, द्राक्षे, ज्वारी , डाळिंब अशी पिके घेतली जात होती. परंतु डाळिंबावर रोग आल्यामुळे काही वर्षांपूर्वी डाळिंबाची बाग नष्ट करून द्राक्षाची बाग लावण्यात आली. दरबारे यांनी आपल्या चार एकर शेतीचा विकास करत करत आणखी शेती खरेदी केली आणि आज दरबार दाम्पत्य १६एकर शेतीवर पीक लागवड करतात.
आर्थिक आणि बाजारपेठेच्या नियोजनासाठी मला पतीची चांगली मदत होते, असे सौ. राजश्री सांगतात. सध्या आमच्या शिवारात सहा एकर द्राक्षबाग आहे. यंदा चार एकरावरील केळीची काढणी झाली आहे. दरवर्षी खरिपात तीन एकरावर मका लागवड असते. उर्वरित शेतीमध्ये ज्वारी व अन्य पिके घेतली जातात. सहा वर्षांपासून सुपर सोनाका द्राक्ष जातीची लागवड केली.
जलसिंचन केले बळकट
दरबारे यांच्या दोन विहिरी व दोन बोरिंग आहेत. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. ठिबक सिंचन वापरल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येतो व कमीत कमी पाण्यात चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होते.
सेंद्रिय खतांना दिले प्राधान्य
सौ. राजश्री आपल्या शेतात रासायनिक खते न वापरता सेंद्रिय खतांचा वापर करतात. शेणखत , गांडूळ खात व कीडनाशक औषधांचा वापर त्या शेतात करतात. रासायनिक खतांमुळे जमिनीतील जिवाणू मृत पावतात व सेंद्रिय खतांमुळे जिवाणू वाढण्यास मदत होते त्यामुळे जमीन भुसभुशीत होते व जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते, याचा अनुभव सौ. राजश्री यांना आला असे त्या सांगतात.
यांत्रिकीकरणावर भर
मजूर टंचाई असल्यामुळे राजश्रीताईंनी फवारणी यंत्र आणि द्राक्ष बागेत शेणस्लरी सोडण्यासाठी यंत्राची खरेदी केली. ही ट्रॅक्टरचलित यंत्रे चालविण्यासाठी एका मजुराची गरज असते. परंतु आता मुलगा संदेश हा महाविद्यालयीन शिक्षण घेत ट्रॅक्टरचलित यंत्रे चालवितो. त्यामुळे योग्य वेळी शिफारशीत प्रमाणात कीडनाशकांची फवारणी तसेच बागेमध्ये शेणस्लरी देणे शक्य होते. खर्चात बचत होते.
Comments
Post a Comment