अशी करावी सूर्यफुलाची लागवड -
सूर्यफूल हे असे पीक आहे जे तीनही हंगामात घेता येते. पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास पिकाची योग्य वाढ होत नाही. शिवाय पिकावर केवडा रोग येण्याची शक्यता असते. सूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
पेरणी हंगाम
खरीप – जुलै पहिला पंधरवडा, रब्बी – ऑक्टोंबर पहिला पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा उन्हाळी – फेब्रुवारी पहिला पंधरवडा.
पूर्वमशागत
जमीनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे.
बियाणे
सुर्यफूलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८-१० किलो बियाणे आणि संकरित वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.
पेरणीचे अंतर
मध्यम ते खोल जमीन – ४५ X ३० सें.मी., भारी जमीन – ६० X ३० सें.मी. तसेच संकरित वाण आणि जास्त कालावधीच्या वाणाची लागवड ६० X ३० सें.मी. अंतरावर करावी.
पेरणी पध्दत
कोरडवाहू सुर्यफूलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. बियाणे ५ सें.मी पेक्षा जास्त खोल पेरू नये. बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्घतीने करावी.
आंतरपिक
आंतरपीक पध्दतीत सुर्यफूल + तूर आणि भूईमूग + सुर्यफूल ओळीने पेरणी केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.
बियाणे
सुर्यफूलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८-१० किलो बियाणे आणि संकरित वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.
जैविक किड नियंत्रण
सुर्यफूलावरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी यांच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही.या विषाणूची फवारणी करावी.
खतांचा वापर कसा कराल ?
कोरडवाहू विकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र + ३० किलो स्फूरद + ३० किलो पालाश द्यावे. यापैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे.
आंतरमशागत
पेरणीनंतर १५-२० दिवसांनी दोन रोपातील अंतर ३० सें.मी ठेऊन विरळणी करावी. पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी करावी तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी.
काढणी
सुर्यफूलाची पाने, देठ व फूलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे चांगली वाळवून नंतर मळणी करावी.
उत्पादन
कोरडवाहू पिकापासून प्रति हेक्टरी ८ ते १० क्विंटल, संकरित वाणापासून १२ ते १५ क्विंटल आणि बागायती/संकरित वाणापासून प्रति हेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पादन मिळते.
Comments
Post a Comment