Skip to main content

# व्यवसायात ‘कोअर’ गोष्टींवर लक्ष द्या,,,

व्यवसायात ‘कोअर’ गोष्टींवर लक्ष द्या_
मी मला आलेल्या अनुभवांची दोन उदाहरणे सांगतो म्हणजे समजेल. मी एकदा एका नवीन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. ते रेस्टॉरंट दिसायला अतिशय आकर्षक होते. रेस्टॉरंट मधील फर्निचर व त्याची मांडणी अतिशय सुंदर होती, तर भांडी आकर्षक, स्वच्छ होती. प्रत्येक कर्मचाऱ्यांना, आचाऱ्यांना, शेफला आकर्षक गणवेश दिले होते. म्हणजे एक उच्च दर्जाचे असे ते रेस्टारंट पाहून कोणीही आकर्षित होईल, असे दिसत होते, परंतु असे असूनही त्या रेस्टॉरंट मधील पदार्थ व त्यांची चव अत्यंत खालच्या दर्जाची होती. त्यामुळे काही महिन्यानंतर ते रेस्टॉरंट बंद होण्याच्या स्थितीत आले.

दुसरी गोष्ट एका कोचिंग क्लासमध्ये गेलो होतो. तिथे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी डिजिटल टीव्ही, ई-बुक्स, व्हिडीओ कॉन्फरन्स, लाईव्ह गाईडन्स अशा अद्ययावत सुविधा तेथे होत्या. ते पाहिल्यावर कोणताही पालक आपल्या पाल्यास अशा ठिकाणी शिकवणीस पाठवेल, असे त्या क्लासमध्ये वातावरण होते; परंतु तरीही त्या क्लासचा निकाल चांगला लागत नव्हता, मुलांना अपेक्षित मार्क्स मिळत नव्हते. शेवटी तो क्लासही नुकसानीत येऊन बंद पडण्याच्या मार्गावर आला, कारण तिथे ज्ञानी आणि हुशार शिक्षकांचा अभाव होता.

मित्रांनो या दोन्ही गोष्टींत एक साम्य आहे ते म्हणजे या गोष्टींमधील रेस्टॉरंट व क्लासेसच्या मालकांनी त्या ठिकाणचे बाह्यरूप कसे आकर्षक होईल याकडे अधिक लक्ष दिले. येथे चांगलेपणाचा फक्त देखावा करण्यात आला. त्या रेस्टॉरंटमधील वस्तू, सजावट कर्मचाऱ्यांचे कपडे या गोष्टींवर जास्त लक्ष दिले होते; परंतु रेस्टॉरंटमधील जो शेफ होता, त्याची गुणवत्ता चांगल्या दर्जाची नसल्याने तेथे मिळणारे पदार्थ तेवढ्या चांगल्या दर्जाचे नव्हते. शेवटी एखाद्या रेस्टारंटमधील उच्च दर्जाचे पदार्थ हीच त्याची महत्वपूर्ण (कोअर) गोष्ट असते, तीच जर चांगली नसेल तर ग्राहक का येतील? दुसर्‍या गोष्टीत क्लासेसचे वातावरण व प्रेझेंटेशन जरी अद्ययावत असले, तरी तेथे शिकवणारे शिक्षक तितक्या चांगल्या दर्जाचे नव्हते, त्यामुळे ते मुलांना चांगल्या पध्दतीने मार्गदर्शन करू शकले नाही, याचा परिणाम मुलांच्या मार्क्सवर होऊन त्याचे बरेच नुकसान झाले. एखाद्या क्लासेसमध्ये उच्च पध्दतीची शिक्षक व शिकवण्याची पध्दत हीच कोअर (महत्वपूर्ण) बाब असते. नेमकी याचीच कमतरता होती. या दोन्ही गोष्टींत महत्वपूर्ण गोष्टींच्या उच्च दर्जाकडे लक्ष दिले गेले नाही, म्हणून नुकसान सोसावे लागले.

उद्योजकांना मी हेच सांगू इच्छितो; व्यवसाय, उद्योग, कोणताही असो त्यामधील कोअर (महत्वपूर्ण) गोष्टी ओळखणे फार महत्वाचे आहे, त्याचा दर्जा उच्च असणे यातच धंद्याचे यश लपलेले आहे. असे न केल्यास ग्राहकच अशा गोष्टी स्वीकारणार नाहीत. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, ‘मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला, तरी लोक दगडाच्या देवावरच नतमस्तक होतात.’

Comments