*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
_४९. मी आहे पैसा…_
--------------------------------
मी पैसा बोलतोय. मी तुमच्याजवळ आहे, तर सगळे तुमचे आहेत; मी तुमच्याजवळ नाही, तर तुमचे कोणीच नाही. माझ्यामुळे सर्व काही आहे, पण मीच सर्वकाही नाही. मृत्यूनंतर मला वर घेऊन जाता येत नाही, पण जिवंतपणी मी तुम्हाला खूप वर नेऊ शकतो. मी देव नाही परंतु देवापेक्षा कमीही नाही. दिसायला मी एक कागदाचा तुकडा असेल पण, जग नियंत्रित करण्याची ताकद माझ्यात आहे. लोक देवाचं विसर्जन करतील पण माझं कधीच नाही. माणसाची नियत व स्वभावात बदल घडवण्याची ताकदही माझ्यात आहे, कारण माणसासाठी पैसा हाच परमेश्वर आहे. काही लोक माझ्यासाठी देव, धर्म, जात, पात, माणुसकी, आत्मसन्मान, विश्वास सोडतात. स्वकीयांशी गद्दारी करतात. फक्त प्रतिष्ठा मिळवण्यासाठी (खोटी की खरी) माझे महत्त्व खूप आहे. लोक अक्षरशः मला पुजतात. लोक माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात, तर दुसर्यांचा (आपल्यांचाही) जीव घेतात.
खरे तर मी जीवन जगण्याचे एक साधन आहे, पण माणूस दिवसेंदिवस माझ्यासाठी गुलाम होत आहे, हे लक्षात घ्या. मला नेहमी खिशात ठेवा, मला कधीच डोक्यात ठेवू नका. मी ज्याच्या डोक्यात गेलो, तो संपलाच समजा. तेव्हा डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवा, मग बघा मी माझ्या अनेक मित्रांनाही तुमच्या घरी घेऊन येईन. माझ्या मित्रांची नाव आहेत, मान, सन्मान, पत, प्रसिध्दी, जमीन, बंगले, गाडी, सोने, फार्महाऊस, हिरे, शेअर्स इत्यादी. पण मी डोक्यात गेलो तर मी माझ्या या सर्व मित्रांसह तुमच्या घरातून निघून जाईन. मला कसे मिळवायचे व कसे वापरायचे हे ज्याला कळले तो जिवंतपणीच स्वर्गसुख भोगतो. मी नवीन नाती निर्माण करतो व जुनी तोडतो. माझ्यासाठी तुमचे हितचिंतक, तुमची जवळची व तुमच्यावर प्रेम करणारी माणसे तोडू नका, कारण हीच माणसे तुमची खरी दौलत आहे. तुमच्या मृत्यूसमयी मी तुमच्या सोबत नसेन, त्यावेळी तुमचा चांगुलपणा, परोपकार, सेवाधर्म, तुमच्या मनाचा मोठेपणा कामाला येईल. माझी पुजा जरूर करा, पण माझ्यासाठी लाचार होऊ नका, माझे गुलाम बनू नका. माणसासाठी पैसा आहे, माणूस पैशासाठी नाही हे कायम लक्षात असू द्या.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते
Comments
Post a Comment