*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*_२२. गुंतवणुकीचे शास्त्र रक्तात भिनवा_*
--------------------------------
सर्वांनाच गरिबीतून श्रीमंत व्हावेसे वाटते व ती श्रीमंती चिरकाल टिकावी असे वाटते, यासाठी गुंतवणुकीचे शास्त्र रक्तात भिनवा. त्यासाठी काही मूलभूत गोष्टी शिका, समजा व ध्यानात ठेवा आणि कुटुंब, मित्र व समाज बांधवांना सांगा.
गुंतवणूक व बचत यातील फरक जाणून घ्या. ज्वारीचं एक बी तुम्ही घरात ठेवलं, ही बचत झाली; पण तुम्ही ते पेरलं तर त्याचे हजार दाने मिळतील, ही झाली गुंतवणूक. गुंतवणूक ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. आंब्याचे झाड लावण्यासारखे आहे. अभ्यास, नियोजन व सबुरी गरजेची आहे. कुणीतरी सांगितले म्हणून नव्हे, तर स्वतः अभ्यास करून बुध्दीने गुंतवणूक करणे म्हणजे खरी गुंतवणूक होय. हा निर्णय कधीही एकट्याचा नसतो. त्यात तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे मतही ध्यानात घ्यावे लागते. गुंतवणूक म्हणजे जुगार नव्हे, हे ध्यानात घ्या.
डायव्हर्सीफाईड गुंतवणूक हा निरंतर श्रीमंतीचा पाया आहे. झटपट श्रीमंती मिळवून देणारी गोष्ट किंवा मार्ग ही कधीच योग्य गुंतवणूक असू शकत नाही. गुंतवणूक या संकल्पनेचे श्रध्दा, सबुरी, निर्णयाचे सखोल विश्लेषण (अॅनॅलिसीस), अभ्यासाची गुणवत्ता, नियोजित धोरण हे मूलभूत पीलर आहेत. गुंतवणूक कोणीही करू शकतो. गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण, स्त्री-पुरुष कोणाचीही ह्यावर मक्तेदारी नाही. कोणत्याही क्षणी व लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करता येऊ शकते.
गुंतवणूकीचा खेळ हा जगातील सर्वश्रेष्ठ खेळ समजला जातो. खरा जिगरबाज, बुध्दीवादी व सहनशील माणूसच ह्यात खरा खेळाडू होऊ शकतो. मारामारी, गुंडगिरी, तापट स्वभाव, गाढवी मेहनत ह्या क्षेत्रात यशस्वी होत नाही. गुंतवणूक हा एक अर्थशिस्तीचा संस्कार होय. हे एकट्याचे नव्हे तर सर्व कुटुंबाचे काम आहे. ती एक धनसंचय व गुंतवणूकीची संस्कृती होय. जैन, मारवाडी, गुजर, पारसी, पटेल, ज्यू, सिंधी अशा समाजात ही संस्कृती खूप ह्यात रूजली आहे. गुंतवणूक म्हणजे फक्त शेअर्स नव्हे. त्याशिवाय व्यवसाय सोने, घरे, प्लॉट, शेती, अॅन्टीक, कमॉडिटी, आयपी अशा अनेक क्षेत्रात असते. त्यामुळे श्रीमंत व्हायचे असेल तर गुंतवणुकीचे हे शास्त्र रक्तात भिनवायलाच हवे.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात त्यासंबंधीचे विवेचन करण्याचा व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
Comments
Post a Comment