*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*_२३. ग्राहकांचा विश्वास गेला की व्यवसाय संपला_*
--------------------------------
ज्ञान, धन, विश्वास हे चांगले मित्र होते, ते हॉस्टेलवर राहत होते. कॉलेज संपले आता जाण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी एकमेकांना प्रश्न विचारला परत केव्हा व कुठे भेटणार? ज्ञान म्हणाले, मी विद्यालयात भेटेन. सकाळी १० ते ५ यावेळेत मी शाळेत असेन. धन म्हणाले, मी श्रीमतांच्या घरी असेन. अगदी २४ तास ३६५ दिवस केव्हाही या, मी तुम्हाला भेटेन. विश्वास मात्र रडायला लागला. 'का रे? तू का रडतोस?' विश्वास हुंदके देत म्हणाला “मी एकदा गेलो, तर पुन्हा कधी नाही भेटणार.” मी कुठेही जात नसतो, जोपर्यंत तुम्ही चांगले, प्रामाणिक आहात, तोपर्यंत मी तुमच्यासोबतच असेन, पण एकदा गेलो की परत केव्हाही येणार नाही.
ही गोष्ट सांगते तुमच्या ग्राहकांचा तुमच्या व्यवसायावरील विश्वास उडाला, की तो परत कधीही येत नाही. एकदा नाव खराब झाले की झालेच, त्याला उपाय नाही. काचेची बाटली फुटली की फुटली. मी एकदा ट्रॅव्हल्सने पुण्याला जात होतो. मी ऑनलाईन सीट बुक केली होती ४५० रुपये देऊन. थोडे पुढे गेल्यावर काही प्रवासी चढले, माझ्या शेजारी येऊन बसलेल्याने सहज सांगितले की त्याला तिकीट केवळ २०० रुपयात मिळाले. एक ग्राहक म्हणून मला ही फसवेगिरी वाटली. ग्राहकांना जमेल तसा चुना लावायचा प्रकार वाटला. पुन्हा त्या ट्रॅव्हल्सने मी कधीच गेलो नाही. पुढे काही महिन्यांनी ती ट्रॅव्हल्स कंपनी बंद पडल्याचे कळले. तात्पर्य, हेच की माझ्यासारखे असे अनेक दुखावलेले ग्राहक असतील, ज्यामुळे टी कंपनी तोट्यात गेली आणि नंतर बंद पडली.
आज जग खूप लहान झाले आहे. थोडीशी चूक, फसवाफसवी एका क्षणात जगभरात माहीत होते. एकदा तुमचा व्यवसाय, ब्रॅंड किंवा व्यक्ती म्हणून मार्केटमधील विश्वास उडाला की तो परत कधीच मिळवता येत नाही. सोनाराच्या दुकानात एखादा जरी नकली दागिना मिळाल्याची खबर मिळाली, तर पुढे त्याने स्टीलच्या भांड्याचे जरी दुकान टाकले, तरी कोण विश्वास ठेवत नाही. लोक म्हणतील, 'स्टीलची भांडी डुप्लीकेट तर नसतील?' विश्वासार्हतेमुळे तुम्हाला क्षमतेच्या १० पट यश मिळते, तर अविश्वासाने आहे तेही मिळत नाही. काही मोठ्या, अनुभवी नेत्यांमध्ये पंतप्रधान बनण्याची पात्रता असते, पण विश्वासार्हता गेल्यामुळे तेही मिळत नाही, ना मंत्रिपद मिळते, ना राज्यात सत्ता मिळते. एकदा विश्वासाहर्ता गेली की सगळेच संपले. पंतप्रधान बनण्याची क्षमता असणारा माणूस खासदारही होत नाही, परंतु विश्वासू माणूस खासदार म्हणून निवडून आला नसला तरी त्याला मंत्री करतात. जगात जिथे जिथे जनता, पैसा, व्यापार, ग्राहक येतो, तिथे तिथे विश्वासार्हतेला खूप मोठे महत्व आहे. ब्रँडीग हे तंत्र आपल्या बिझनेसची विश्वासार्हता वाढविण्याचेच काम करते. पतंजलीसारखा ब्रॅंड यामुळेच वेगाने मोठा होत आहे.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात त्यासंबंधीचे विवेचन करण्याचा व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
Comments
Post a Comment