*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*_२९. पालीकडून मॅनेजमेंटचे धडे शिकावे_*
--------------------------------
प्रश्न : मी वसंत पाटील. मी एका हॉटेल लाईनची माहिती असणाऱ्याबरोबर पार्टनरशीपमध्ये ढाबा सुरू केला. जागा, बांधकाम या सर्व गोष्टींसाठी सर्व मिळून ४० लाख रुपये भांडवल गुंतवले. म्हणावा तसा धंदा नाही, महिना ४० हजाराचा तोटा होतोय, घाबरून पार्टनरही पळाला, काय करावे?
उत्तर : जागा, मार्केटची माहिती, कौशल्य व अनुभवाशिवाय व्यवसाय सुरू केले जातात याचे हे उदाहरण होय. पण पूर्वतयारी, अनुभव, अभ्यास असूनसुद्धा व्यवसायात काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. उदा. मार्केट कंडीशन, पार्टनरचे वर्तन, कायदे, स्पर्धा इत्यादी. आपला त्या क्षेत्रात अनुभव नसल्यास परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाते. व्यवसायातील अडचणी, तोटे हे केव्हाही मनावर व जिव्हारी लावून घ्यायचे नसतात. व्यवसाय हा केव्हाही बुध्दी व विवेकाने करायचा असतो. जसे तुम्ही पालीला मारण्यासाठी धावलात, तर तिला जिवावर बेततंय असं वाटतं. तेव्हा शेपूट तोडून आपले शरीर वाचवून पुढे निघून जाते. तसेच तोटा होतोय व परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जातेय असे वाटते, तेव्हा कोणत्याही भावनिक मुद्याचा विचार न करता ताबडतोब तो व्यवसाय बंद करण्याचा, काही भाग विकून जे वाचतील ते पदरात पाडण्याचा विचार करावा. तसेच रखडत राहिला, तर आहे तोही संपूर्ण व्यवसाय कर्जात बुडेल. 'सर सलामत तर टोपी हजार' तसेच जीव सलामत तर शेपूट हजार. पालीला नवीन शेपटी आठवडाभरात नवीन उगवून येते.
एका शेतकऱ्याचा मला फोन आला. म्हणाले, मला ५ लाखाचे कर्ज आहे. आत्महत्या करावीशी वाटते. मी विचारले, जमीन किती आहे? तर ३ एकर, किंमत ३० लाख रुपये. साधे गणित आहे. ३० लाख वजा ५ लाख झाले २५ लाख. बँकेला घाबरू नका. व्यवहारानुसार बँकच तुम्हाला २५ लाख देणे लागते. बँकेला म्हणा, तुच दे मला २५ लाख. तेव्हा पैशाच्या गोष्टी जिव्हारी लावायचा नसतात. व्यवहाराने व विवेकाने निर्णय घ्यायचे. जीव सुरक्षित असेल तर आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या संधी उपलब्ध आहेत. तेव्हा वसंत पाटील, तुम्हाला विषय नियंत्रणाबाहेर गेलाच आहे असे वाटत असेल, तर थोडाफार तोटा झाला तरी चालेल, पण पटकन बाहेर पडा व पुन्हा पूर्ण अभ्यास व तयारीनिशी व्यवसायाची नवीन सुरुवात करा. मोठी उडी घेण्यासाठी चार पावले मागे घेणे हे सुध्दा कधी कधी शहाणपणाचे असते.
लेखात त्यासंबंधीचे विवेचन करण्याचा व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया,
Comments
Post a Comment