*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
_४१. मराठी माणसाने वॉरेन बफेट यांचे सूत्र वापरावे_
--------------------------------
वॉरेन बफेट म्हणतात, ‘‘मला एका मार्गाने १० रुपये मिळण्यापेक्षा, १० मार्गांनी प्रत्येकी १ रुपया मिळालेला अधिक आवडेल.’’ परवाच काही व्यवसाय सुचवा म्हणून पन्नाशीत असलेले सदाशिवराव भेटायला आले. आयटीआय झाल्यानंतर पुण्यात एका कंपनीत फिटर म्हणून लागले. पुढे पुण्यात खोली घेतली, बायको, दोन मुलं असा परिवार. मुलगी लग्नाला आलेली, मुलगा कॉलेजात शिकतोय. अचानक त्या कंपनीचा विदेशी कंपनीबरोबर करार ठरला व कंपनी बंद पडली. सदाशिवराव एकटेच कमवत होते, घरात उपासमारीची वेळ आली. असलेली बचत सहा महिन्यांत संपली. चांगल्या कंपनीतही नोकरी मिळेना, कारण तरुण इंजिनिअरला नोकरी नाही, मग त्यांना कुठली? शेवटी बायको चार घरची धुणीभांडी करायला लागली. मुलगी कॉस्मेटिक दुकानात सेल्समन म्हणून कामाला लागली व मुलगा कॅटरींग कंपनीत वाढप्या म्हणून काम करू लागला. कुटुंब पोटापुरते कमवू लागले व कशीबशी उपासमारी टळली, पण हलाखी चालूच होती.
अशी दारिद्र्याची परिस्थिती आली, कारण वॉरेन बफेट यांचे सूत्र डोक्यात न घेतल्यामुळे. जर श्रीमंती निरंतर टिकवायची असेल, तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत हवेत, एका स्त्रोतावर विसंबला तो संपला. मराठी कुटुंबाने एकाच्याच उत्पन्नावर अवलंबून राहू नये. एक भाऊ शेती करत असेल, तर दुसर्याने व्यवसायात पडावे, तिसर्याने दूर शहर परदेशात जावे. बायकांनाही काही जोड व्यवसाय सुरु करून द्यावा. हाताला काम असलं की तिरकी बुध्दी चालत नाही व काड्या लावून भांडणतंटा होत नाही. मुलांनी कॉलेज शिकून, गॉगल घालून गल्लीत मिरवून हिरोगिरी करण्यापेक्षा पार्टटाईम काम करून चार पैसे कमवावे. मुलींनी काही कौशल्य प्राप्त करावे व चार पैसे कमवावे, कसब मिळवावे. कुटुंबातील सर्वांनी काम करावे व सर्व मराठी कुटुंबांनी श्रीमंत होत राहावे.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते
Comments
Post a Comment