*उद्योग आणि मराठी माणूस...* -------------------------------- *_२०. शेतकर्यांना श्रीमंत, सुखी होण्यासाठी २७ टिप्स_* -------------------------------- शेतकर्यांना आपण राजा म्हणतो, पण तोच आज अडचणीत, दारिद्र्यात, दुष्काळात होरपळत आहे. तो व त्याची पुढची पिढी श्रीमंत, सुखी व्हावी यासाठी काय करायला हवे, यासाठी मी काही टिप्स देत आहे. *भाग - १* *१) माहिती घ्या :* शेतकर्यांनो हे जग माहितीचे आहे. ज्याच्याकडे चांगली, जास्त व अद्ययावत माहिती आहे, त्याची फसगत होत नाही. काय करायचे, काय नाही करायचे याचे ज्ञान व योग्य निर्णय घेता येतो. पुस्तके, वृत्तपत्रे, इंटरनेट इत्यादींचा वापर करा व सतत माहिती घेत रहा. *२) एकत्र या :* खेकड्याप्रमाणे एकमेकांचे पाय ओढण्याचा गुण सोडा. भाऊबंधकीमुळे इतिहास काळापासून मराठी समाजाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. तेव्हा एकीचे बळ लक्षात ठेवा. एकीमुळे मानसिक बळ मिळते, प्रगती होते; तेव्हा कुटुंबात, गावात समाजात व भावकीत एकीने वागा. *3) पुढार्यापासून लांब :* देश स्वतंत्र झाल्यापासून शेतकर्यांचा सर्वाधिक वेळ कोणी खाल्ला असेल, तर तो म्हणजे पुढारी. मोर्चा न्यायला, मोठा नेता आला भाषणाला चला, पाणी परिषेदेला चला. नुसती दिशाभूल आणि गंडवागंडवी. पुढार्यांच्या नादाला लागून कित्येक शेतकर्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केले, शेती सावकारांना विकली, कुटुंब वार्यावर व शेवटी बायको मुलांना दुसर्यांच्या शेतावर मोल मजुरी करण्याची वेळ आली. तेव्हा पुढार्यापासून दोन हात लांब रहा. *४) सावकाराचे नाव नको :* मदर इंडिया सिनेमा तुम्ही बघितला असेल, सावकारीपाशामुळे कसे लाखो करोडो शेतकऱ्यांचे कसे नुकसान झाले. तेव्हा सावकाराचे पैसे कोणत्याही परिस्थितीत घेऊ नका. *५) व्यापार्यापासून सावध :* अनादी काळापासून शेतकर्यांना पिळणारा प्राणी म्हणजे व्यापारी. त्याच्या दर पाडण्याच्या कलेपासून सावध रहा. आपला माल हवंतर उशिरा विका पण व्यापार्यांना बळी जाऊ नका. स्वतः व्यापार शिका; व्यापारी, सावकार, पुढारी ह्या त्रिकुटापासून लांब व सावध रहा. *६) काम म्हणजे भक्ती :* आपली शेती व काम सोडून १५ दिवस वारीला व देवदेव करणारे शेतकरी पाहिले. शेतकरी १५ दिवस वारीला व शेत, कामधंदा तिकडे वार्यावर, अशी अवस्था नसावी. काम ही भक्ती आहे लक्षात ठेवा. कीर्तनकार बाबा रोज २५ हजार कमावतो व तुम्ही ठणठण गोपाळ, तेव्हा जागे व्हा. *७) एकतरी व्यवसाय :* शेतीसोबत एकतरी व्यवसाय कराच, फक्त शेतीवर अवलंबून राहू नका. कोणताही असो, छोटा मोठा व्यवसाय सुरू कराच. *८) एकाने बाहेर :* घरातील सर्वांनीच शेतीवर अवलंबून राहू नका. घरातील किमान एकतरी मुलाने गावाबाहेर पडा. शहरात, परदेशात, व्यवसायात जा. बाहेरील पैसा भांडवल म्हणून वापरता येईल व सावकारी पाश पडणार नाही. *९) स्वतःसाठी अन्न :* मी अनेक ऊस, द्राक्षं उत्पादक व बड्या शेतकर्यांना भेटलो, ते पण स्वतःसाठी लागणारे धान्य, भाजीपाला बाजारातून विकत आणतात. तेव्हा किमान १० गुंठे जमिनीत स्वतःसाठी लागणारी फळे, भाजीपाला, धान्य घरी वर्षभर पुरेल एवढे पिकवा. केवळ पैशासाठी शेती करू नका, स्वतःसाठी सकस आहार घ्या. *१०) स्त्रीभ्रूण हत्या नको :* मुलगा होण्याच्या हव्यासापोटी स्त्रीभ्रूण हत्या करू नका. स्त्री म्हणजे लक्ष्मीचे रूप. जर तुम्ही लक्ष्मीची हत्या करत असाल, तर तुमच्या घरात श्रीमंती कशी येणार. अशा विचाराने तुमच्या घरात कधीही समृध्दी येणार नाही. *११) कमी खर्चात लग्न :* मोठा मंडप घातला, गाव लाडू, जिलेबी खाऊन गेले, पण कर्ज फेडणार तुम्ही. नाही तर मग दोन एकर विकायचे. शेवटी अक्षदा पडली की संपलं, पुन्हा कोणीही येणार नाही. *१२) मुलामुलीत समान वाटणी :* मृत्युपत्रात मुला व मुलींना समान वाटणी द्या, कारण तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करणारी मुलगीच असते. प्रेतावर रडणारी फक्त बायको व मुलगीच असते व वृध्दाश्रमात पाठवणारा मुलगा असतो हे लक्षात ठेवा. म्हातारं कधी टपकतयं व दोन एकर कधी विकतोय याची वाट पाहणारा मुलगा असतो, हे लक्षात ठेवा. *१३) बायकोच्या नावे १ एकर :* जिने तुमची अर्धांगिनी म्हणून जीवन काढले, तिला तुमच्या मृत्यूनंतर कोणत्याही सुना सांभाळणार नाहीत हे लक्षात ठेवा. तेव्हा किमान एक एकर जमीन बायकोच्या नावे करा, नाहीतर तिला म्हातारपणी जनावराच्या गोठ्यात जागा दिली जाईल. आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात त्यासंबंधीचे विवेचन करण्याचा व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा. - प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...
Comments
Post a Comment