*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*_२६. दुकानासाठी जागा कशी निवडाल?_*
--------------------------------
कोणतेही दुकान असो, बेकरी, किराणा, हॉटेल, आईस्क्रीम किंवा इतर कुठलेही; त्याचे ८०% यश हे त्याची जागा निवडण्यात असते. जागा निवडण्यासाठी शास्त्रशुध्द मार्केट रिसर्च कसा करायचा हे लक्षात घ्या.
१) लोकसंख्या - आजूबाजूच्या अंदाजे १ किमी अंतरावरील एकूण लोकसंख्या किती आहे.
२) उत्पन्न - त्या परिसरातील लोकांचे सरासरी मासिक उत्पन्न व जीवनस्तर कसा आहे.
३) दुकानाची जागा कशा प्रकारच्या इमारतीत आहे. ती जुनाट आहे की चांगले कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे.
४) फुटपाथ - त्या दुकानासमोरील रस्त्यावरून किती लोक पायी चालत जातात
५) वाहनांची संख्या - रोज समोरून किती वाहने ये-जा करतात.
६) स्पर्धा - तुम्ही ज्या पध्दतीचे दुकान टाकणार आहात त्याच्या आजूबाजूच्या अर्धा किमी अंतरावर अजून अशी किती दुकाने आहेत व त्यांचा सरासरी रोजचा गल्ला किती आहे.
७)वस्तीप्रकार - तो परिसर जुनाट आहे, वेगाने वाढणारे उपनगर आहे, नवीन अपार्टमेंट, बंगले वैगरे तयार होत आहेत का? याचा अंदाज घ्या.
८) किमान २००-२५० स्वेअर फुटाचे दुकान मिळायला हवे. खूप लहान व खूप मोठेही कामाचे नाही.
९) तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असल्यास तेही ध्यानात घ्या; पण दारूचे दुकान गटारीच्या कडेला असले तरी चालते, मग वास्तुशास्त्र आपणच का पाळायचे.
२५ लाखात एकाला बेकरी सुरू करायची होती. त्याला दिलेला सल्ला बघा व तुमचा व्यवसायाच्या अनुषंगाने तुम्ही निर्णय घ्या. आजूबाजूच्या अर्धा किमी अंतराची लोकसंख्या १० ते १५ हजार, लोकांचे सरासरी मासिक उत्पन्न २५ ते ४० हजार हवे, दुकान हे पॉश कॉम्प्लेक्स मध्येच हवे. दुकानासमोरून पायी जाणार्या लोकांची संख्या रोज १५०० हवी, समोरून जाणार्या वाहनांची संख्या ५०० हवी. ५०० मीटरच्या अंतरावर दुसरी बेकरी नसावी. हे दुकान वेगात व नवीन वाढणाऱ्या उपनगर किंवा परिसरात असावे, ते जुनाट व गावठाण परिसरात असू नये. दुकान किमान ४०० ते ७०० वर्गफुटाचे असावे. तुमची रास व शुभ अंकानुसार दुकानाचे वास्तुशास्त्र तपासा, पण तुमचा विश्वास असेल तर (माझा नाही) कारण मी देव मानत नाही. माणूस हाच देव आहे आणि कर्तुत्ववान माणूस म्हणजे देव.
हे सूत्र थोड्याफार फरकाने सर्व प्रकारचे दुकान सुरू करण्यासाठी लागू पडते. आपले ठिकाण, जिल्हा, तालुका, शहर ह्यानुसार बदल व फरक पडेल तो आपण आपल्या अंदाजानुसार करून समजून घ्या व दुकानासाठी जागा निवडताना अचूक निर्णय घ्या. तुमच्या व्यवसायिक जीवनास माझ्या हार्दिक शुभेच्छा! 'फक्त दुकानावर मराठी पाटी नको, तर दुकानच मराठी माणसाचे हवे' ह्या विचारांचा मी आहे. फक्त मराठीत पाटी असून काय फायदा? पैसे आपल्या गल्ल्यात पाहिजे.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात त्यासंबंधीचे विवेचन करण्याचा व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
Comments
Post a Comment