Skip to main content

मूर्खपणा

एक छोटासा अनुभव

आणखी किती मूर्खपणा करणार आहोत आपण ? आपल्याला वेड्यात कडून ते लखपती, करोडपती झालेत आणि आपण कमेंट मध्ये आपले मोबाईल नंबर देण्यातच धन्यता मानत आहोत... 

घरबसल्या व्यवसाय करा, आम्हीच कच्चा माल देऊ, आम्हीच विकत घेऊ.... असल्या फालतू प्रकारात तुम्हाला तेवढंच मिळतं जेवढं एखाद्या कंपनीत कामगार म्हणुन रोजंदारीवर काम करुन मिळतं.... आणि तेही दोन चार महिने, त्यापेक्षा जास्त काळ नाही.

यात फक्त तुम्हाला व्यवसाय केल्याचं (?) समाधान मिळतं, आणि समोरच्याचं फिक्स पगार देण्याचं टेन्शन संपतं... तुम्ही अप्रत्यक्षपणे घर बसल्या हमालीच करत असता.
यात जर ते तुम्हाला काही मशिनरी विकणार असतील तर तुम्ही त्यांच्याशी कायमस्वरुपी व्यवहार करु शकणार नाही याची काळजी आधीच घेतलेली असते. रिजेक्शन च्या नावाखाली डेबीट चा एवढा भडीमार होतो की सहा महीन्यात तुम्ही कंटाळुन जाता...

घरबसल्या व्यवसाय हा प्रकार व्यवसाय नाही, ही फक्त हमाली आहे... व्यवसाय म्हणजे विक्री....., बनवायचं काम कामगाराचं असतं...
___

याहीपुढचा कळस म्हणजे... घरबसल्या मेसेज ईमेल पाठवून महिना पंधरा वीस हजार कमवा... अरे असे ईमेल आणि मेसेज पाठवून हजारो रुपये मिळाले असते तर सगळ्यांनी तेच काम नसतं का केल ? कुणीतरी फेसबुक वर एखाद्या ग्रुप वर असली पोस्ट करतो आणि आपण सगळे बावळटासारखे त्याला आपले मोबाईल नंबर देत सुटतो.

कधी कुणी म्हणतंय... शेअर मार्केटमध्ये दहा हजार गुंतवा, दिवसाला तीन चार हजार कमवा... लागलो आपण आपले मोबाईल नंबर द्यायला. अरे जर दहा हजार गुंतवून दिवसाला तीन चार हजार काहीही न करता मिळत असतील तर हे भामटे स्वतः का नाही कमवत? फेसबुक वर इतरांना का विनंत्या करतात? एवढा सध्याही विचार आपण का करत नाही ?

कुणी म्हणतंय ... महिन्याला दोन लाख रुपये कमवा. नेटवर्क बनवा... आयुष्यभर पैसे कमवा. पोस्ट वाचली कि अंगात आल्यासारखं आपण आपले नंबर द्यायला सुरुवात करतो. अरे बाबांनो आधी त्या पोस्टकर्त्याला सांगा पोस्ट सोबत तुझ्या बँक पासबुक ची झेरॉक्स दे म्हणून. तू काय दिवे लावलेत सांग म्हणावं. पुन्हा तोंड दाखवणार नाही तो तुम्हाला. 

काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक जण आला होता. म्हणाला माझ्याकडे अशी स्कीम आहे कि आज लाख रुपये गुंतवून मी पुढच्या दोन वर्षात शंभर कोटी कमावू शकतो.... तुम्ही पण गुंतवा... काय बोलणार ? साष्टांग दंडवत घालून त्याला वाट लावलं. त्याला तो चुकतोय हे सांगण्याच्या फंद्यातही पडलो नाही. सांगणार तरी काय ? ज्याला आपण जे बोलतोय ते फक्त मूर्खपणाच्या पंक्तीतच मोडत हे कळत नाही त्याला समजून तरी काय सांगणार? 

असल्या भुक्कड जाहिरातींवर आपण जे आपले मोबाईल नंबर ईमेल देतो ते एकत्र करून लाखो रुपयांना विकले जातात हे माहित आहे का? चैन बनवायच्या नादात आपण आपल्याच आप्तेष्टांना दुखावतोय, त्यांना दुरावतोय हे लक्षात येत नाहीये का? वर्षभरानंतर ना ती चैन राहते, ना आपले मित्र आप्तेष्ट सोबत राहतात ना हाती पैसा राहतो. वर्ष दोन वर्षे वाया गेल्यावर मग आपल्याला अक्कल येते. आपल्या कमी कष्टात पैशाच्या हव्यासाचा फायदा घेऊन हे लोक लखपती करोडपती झालेत, आणि आपण बावळटासारख घरपोच बसल्या जागेवर कोण लाखो करोडो देतय याची वाट पाहतोय.

किती दिवस आपण आणखी हा मूर्खपणा करत राहणार आहोत? व्यवसाय असा होत नसतो. सोपा पैसा हा फक्त चित्रपटातच आणि तुम्हाला लुटण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बिझनेस (?) सेमिनार मधेच दिसतो... प्रत्यक्षात नाही. व्यवसाय काय टाईमपास नाही, कि असल्या घरपोच, घरबसल्या तुम्ही लाखो करोडो रुपये कमावू शकता. 

ऊद्योजक व्हायचं असेल तर आयतं, घरपोच, विनाकष्ट, विना झंजट, ईझी मनी असल्या मानसिकतेपासुन दूर व्हा... या फसव्या जाहिरातींच्या नदी लागू नका. व्यवसाय इतका सोपा नसतो. आणि पैसे मिळवणं इतकं सोपं असतं तर इथं प्रत्येकजण करोडपती दिसला असता. बिल गेट्स असो किंवा अंबानी असो ढोर मेहनत करतात, नवनवीन कल्पना लढवतात, दिवसातले १५-१८ तास काम करतात, म्हणून ते श्रीमंत आहेत, मोठे उद्योजक आहेत. असा घरबसल्या पैसा जर धीरूभाईंनी अपेक्षिला असता तर आयुष्यभर पेट्रोल पंपावरच काम करत राहिले असते. अशा ईझी मनीच्या मागे जर बिल गेट्स लागले असते तर आयुष्यभर आपल्या छोट्याशा वर्कशॉप मधेच बसून राहिले असते.

भुरट्या लोकांपासून लांब राहा रे बाबांनो. मी काही व्यवसायातला तज्ज्ञ नाही, अनुभवी नाही, पण या घरबसल्या पैशाच्या जाहिराती फसव्या आहेत हे पाहताक्षणीच लक्षात येते. लगेच लक्षात येत कि इथे गडबड आहे, फसवणूक आहे... तुमच्या का लक्षात येत नसेल? कि लक्षात येतं पण तरीही सोप्या पैशाची हाव आपल्याला त्यांच्या मागे जायला प्रवृत्त करते? तसं असेल तर तुमचा तुमच्या मनावर आणि मेंदूवर बिलकुल ताबा नाहीये, आणि ज्याचा आपल्या मनावर मेंदूवर ताबा नसतो तो कधीही यशस्वी होत नसतो हे लक्षात घ्या.  

छोटासा का असेना एक चांगला व्यवसाय सुरु करा. जो व्यवसाय करताल त्यात जास्तीत जास्त तज्ञ व्हा, ज्ञान मिळावा, स्किल वाढावा...  पैसा हा व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. व्यवसाय मोठा झाला कि पैसा झक मारत तुमच्या मागे येतो. पैशाच्या मागे लागाल तर तो तुमच्या हाती कधीच येणार नाही, कितीही झटलात तरी आयुष्यभर पैसे पैसेच करत बसाल आणि हाती मात्र दमडीही शिल्लक नसेल. पैशाच्या मागे लागू नका, पैसा कायम ज्याच्या सावलीत वाढतो त्यावर लक्ष केंद्रित करा, तो म्हणजे व्यवसाय..... 

व्यवसाय साक्षर व्हा...
ऊद्योजक व्हा...
समृद्ध व्हा...
_
आवड़ला तर शेयर करा

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...