*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*_१३. वेडे इतिहास घडवतात आणि ज्ञानी नोकर बनतात*_
--------------------------------
काही दिवसांपूर्वी एका पॉश कॉर्पोरेट पार्कमध्ये एका फायनान्स कंपनीच्या एमडीसोबत माझी मिटींग होती. दुपारी २.३० वाजता मिटींग संपली. मिटींग संपल्यावर मी खाली आलो; मी पाहिले की, त्या कॉर्पोरेट पार्कच्या खुल्या गार्डन एरियामध्ये काही लोक लंच टाईमनंतर उभे राहून एकमेकांशी गप्पा मारत होते, धूम्रपान व आराम करत होते. त्यातील एकजण ओळखीचा वाटला. त्यानेदेखील मला पाहिले. तो म्हणाला, "तू प्रकाश आहेस ना? म्हणजे आपला पक्या? मी राज.” मग आठवले, राज आणि मी हॉस्टेलमध्ये राहायचो. तब्बल २० वर्षांनंतर आमची भेट झाली होती. बारावीला असताना त्याने ८६% गुण मिळवले होते. नंतर इंजिनीअरींगला न जाता साहित्य अभ्यास करण्याची निवड केली. प्रत्येकजण त्याला वेडा म्हणत होता. परंतु आता तो ई-लर्निंग या कंपनीत कन्सल्टींग स्क्रिप्ट कंटेंट रायटर व डायरेक्टर म्हणून काम पाहतो. तो विविध बिझनेस फिल्मसाठीदेखील लेखन करतो. राजचे वार्षिक उत्पन्न सध्या २५ लाख रुपयांपेक्षाही जास्त आहे. ज्यांनी इंजिनीअरींग केले ते खाजगी कंपन्यांमध्ये ९ ते ७ या वेळेत नोकऱ्या करतात. आपले पोट भरण्यासाठी व घरांचे ईएमआय फेडण्यासाठी रोज तेच कंटाळवाणे व नीरस काम करावे लागते, त्यांच्यापेक्षा राज संतुष्ट व समाधानी जीवन जगतोय; केवळ तो जास्त कमावतो म्हणून नव्हे, तर त्याच्या कामातून त्याला आनंद मिळतो.
राजने तेच क्षेत्र निवडले जे त्याच्या मनाला आवडले, परंतु इथपर्यंत पोहोचणे सहज नव्हते. सुरूवातीच्या काळात त्याने १५ हजार रुपये पगारावर काम केले. हळूहळू तो आपले लेखनकौशल्य विकसित करत गेला व आज या स्तरावर पोहोचला. आता त्याची एका चित्रपटासाठी सहाय्यक पटकथा लेखक म्हणून नेमणूक झाली आहे, जेथे त्याला एका चित्रपटासाठी १५ लाख रुपये दिले जातील. तो भविष्यात कदाचित गुलझार, सलीमखान, जावेद अख्तर, किरण राव, अनुराग कश्यप, गौरी शिंदे, सौरभ शुक्ला, नागेश कुकनूर, इम्तियाझ अली, अमोल गुप्ते, नागराज मंजुळे यांच्याप्रमाणेच प्रतिभावंत होईल. भविष्यात काय होईल, कोण जाणे? आपण आपल्या मनाचा मागोवा घेत राहावे. स्वतःच्या भवितव्याविषयी निर्णय घेताना इतरांचे सल्ले व मार्गदर्शन जरूर घ्यावे, परंतु निर्णय स्वत:च्या मनाला पटणारे घ्यावेत. अनेक आयआयटी व आयआयएम पदवीधारक स्क्रिप्ट रायटींगकडे वळू लागलेत आणि चांगले उत्पन्न कमवू लागलेत.
मी ऑफिसमध्ये परत आल्यावर इंटरनेटवर साहित्य व लिखाण क्षेत्रातील संधीचा शोध घेतला. मला युवकांसाठी खरोखरच चांगल्या संधी दिसून आल्या. एक चांगला स्क्रिप्ट रायटर वर्षाला ३ ते ५ लाख रुपये कमावतो, तर अनुभवी लेखक ७ ते १० लाखांपेक्षाही जास्त कमाई करतो. यामध्ये फिल्ममधील स्क्रिप्ट रायटींगव्यतिरिक्त जाहिरात एजन्सी, कॉर्पोरेट व्हिडीओ स्क्रिप्ट, युट्यूब व्हिडीओ, सोशल मीडिया, एसईओ, ब्लॉग्स, ई-बुक, ई-लर्निंग, अॅनिमेशन इत्यादी क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. या सर्व क्षेत्रात १०० पेक्षाही जास्त प्रकारामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत. फ्रीलान्स कंटेंट रायटर म्हणूनही करियर करता येते.
उत्पन्न:- फ्रेशर्ससाठी वर्षाकाठी तीन ते चार लाख उत्पन्न कमावता येते, तर किमान ४ वर्षे अनुभव असल्यास ६ ते ८ लाख वार्षिक उत्पन्न मिळू शकते. तसेच १० वर्षे अनुभव असल्यास हे उत्पन्न ८ ते १२ लाखांपर्यंत जाऊ शकते. बरेच उत्तम लेखक वर्षाला २० ते ४० लाख रुपये कमावतात, तर जे सुप्रसिध्द व किर्तीमान लेखक आहेत, त्यांचे उत्पन्न कोट्यावधीमध्ये असते. सरकार तसेच टीव्ही चॅनेल्सकडून इथे कायम सन्मान मिळतो, त्यामुळे खास ओळख व प्रसिध्दी मिळते. या क्षेत्रात सुरूवातीस छोट्या व अत्याधुनिक स्क्रिप्ट रायटींग शिकून तुमची कौशल्ये व आवड विकसित करावी लागतात. सुरूवातीस काही छोट्या प्रोजेक्टवर काम करून व अनुभव घेऊन हळूहळू प्रगती साधता येते. जर कोणी या क्षेत्रात उत्कटपणे आवड दाखवत असेल तर मी नक्कीच मार्गदर्शन सहकार्य करीन.
महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
Comments
Post a Comment